सोमवार, 12 जनवरी 2015

SHAKKAR KE PAANCH DAANE (MARATHI) TRANSLATION- SHARVARI PATANKAR

“हल्ली बर का, मी एका विशिष्ट पद्धतीने स्मित करतो. आणि एका विशिष्ट पद्धतीने हसतो. हो हो, मी जिवंत रहायला शिकलोय. आता जे जसं दिसतं, मी ते तस्सच पहातो. जे दिसत नाही ते नसतच बर का माझ्यासाठी. मला काही फरक पडत नाही. मी आहे एक यशस्वी मध्यममार्ग...... रोज घरून निघतो, रोज घरी परततो. कश्शाचा परिणाम होत नाही माझ्यावर. किंवा माझ्या जिभेची चवच हरवलीये म्हणा ना... आता मला प्रत्येक गोष्ट एकसारखीच दिसते...शुभ्र! मला काही माहित नसतं बर का पण मला सगळं माहित्ये असा भाव मी आणतो चेहेऱ्यावर. प्रत्येक किश्श्यावर हसणं, उसासे टाकणं, येतं मला. मी आता खुश आहे...नाही नाही खुश नाही मी सुखी आहे...सुखी. कारण आता आहे काय? मला तर फक्त जिवंत रहायचय. आता मी उडत नाही, वाहत नाही, मी थांबलोय. तुम्ही काहीही समजा, मी आता तटस्थ झालोय. बर का! आता मी खरा आहे. बऱ्यापैकी खरा आहे. “माझ्या कल्पनेच्या कुशीत विसावून मला ते जग पाहूदे.. ज्याच्या प्रतिबिंबात मी जगतोय” हे सगळं आता खोटं वाटतं! माझा हा नवा नवा खरेपणा हसतोय बघा.. माझ्याच जुन्या जुन्या कल्पनांना... अरे हो, आजकाल मी ही बराच हसतो बर का. कधी कधी वाटतं मला हसण्याचा आजार झालाय. पण मग त्याचंही हसू येतं. आता सगळ्या गोष्टी आपापल्या जागी आहेत. हे सगळं बऱ्यापैकी आवडतंय मला. आवडतंय म्हणजे ठीक वाटतंय....हो, ठीक वाटतंय. पण......एक चिंता मात्र आहे.........आता काय सांगू... हल्ली मला रडू येत नाही....विचित्र आहे ना... सुख काय आणि दु:ख्ख काय मला कशामुळेच फरक पडत नाही. थोडं वैतागलं किंवा थोडं हसलं की झालं काम, दु:ख्ख ही खुश आणि सुखही खुश. विचित्र आहे की नाही ही गोष्ट.....नाही ही विचित्र गोष्ट नाहीये ही एक विचित्र जाणीव आहे. समजा तुम्ही मृत आहात पण कोणी त्यावर विश्वासच ठेवत नाही. नेहेमीसारखीच लोकं तुमच्याशी बोलतात, तुम्हांला चहा पाजतात, तुमच्याबरोबर फिरायला येतात. आणि फक्त तुम्हांलाच हे माहित्ये की तुम्ही जिवंत नाही. मला माहित्ये की अगदी रडू फुटावं असंच आहे हे सगळं... पण तुम्हांला आश्चर्य वाटेल, की तरीही मला हल्ली रडू येईनासं झालंय.” अहो नाही नाही....ही कविता मी नाही लिहिली....मी कुठला लिहितोय कविता-बिविता...माझी कुवतच नाही तेव्हढी... त्या जड जड शब्दांना एकमेकांशी लढवायच, मग त्यांना कुस्ती खेळायला लावायची आणि मग या भीषण हिंसेमधून काहीतरी एक गोष्ट अशी आपल्या समोर आणायची.....खरं तर हेच एक आश्चर्य आहे नाही? मला तर कविता वाचताना आणि ऐकतानाच घाम फुटतो. मुळात कुस्ती आणि कवितेमध्ये काही विशेष फरक आहे असं मला वाटत नाही.. मला अजूनही कळलेलं नाही की कुस्ती का खेळतात आणि कविता का लिहितात. मी जेव्हा हे पुंडलिक ला विचारलं, तेव्हा तो म्हणाला की कुस्ती ही बाह्यांगाने खेळली जाते तर कविता अंतरंगाशी कुस्ती करून लिहिली जाते... मला काहीच कळलं नाही. त्यामुळे माझ्या तोंडून फक्त एक असं “हुं....” निघालं. पुंडलिक समजला. तो म्हणाला, “ राजकुमारा, प्रॉब्लेम हा नाहीये की तू बेअक्कल आहेस...प्रॉब्लेम हा आहे की तुला जरा अक्कल कमी आहे. (प्रॉब्लेम हा नाहीये की तू बावळट आहेस...प्रॉब्लेम हा आहे की तुला जरा कमी कळत.) (त्याला मुंग्या दिसतात, तो मुंग्यांशी खेळायला लागतो...मग परत उठतो..) समस्या........मी नं समस्यारूपी एका मोठ्या डोंगरावर फिरतोय सध्या....काय बाबा काय......समस्या काय आहे? तीच तर भली मोठी समस्या आहे नं......एखादी समस्या समोर येते तेव्हा ती आपल्याबरोबर एक उत्तर घेऊन येते आणि ते उत्तर पुन्हा एक प्रश्न निर्माण करतं. म्हणजे आणखी एक समस्या.. असं म्हणतात की जर एखाद्याच्या आयुष्यात समस्या नसतील तर समाजाव की तो आयुष्य जगलाच नाही...अरे? म्हणजे आत्तापर्यंत मी जीवन जगलोच नाही म्हणायचं कारण माझ्या आयुष्यात कुठली समस्या कधी आलीच नाही...खरं तर “समस्या” हा शब्द मला इतका आवडतो नं.....माझी नेहेमीच अशी इच्छा होती की मला असं विविध समस्यांनी ग्रासाव ....माझ्या चारी बाजूंना समस्यांचे डोंगर असावेत म्हणजे मग त्यांना भेदून जात मी ते पार करू शकेन .....पण माझं इतकं नशीब कुठलं? नाही म्हणायला काही अडचणी आल्या पण त्यांना आपण “समस्या” हे भारदस्त नाव नाही देऊ शकत. पण आता मात्र मी खुश आहे हां, कारण या चिठ्ठीच्या रुपात माझ्याकडे अशी एक गोष्ट आलीये जिला आपण “समस्या” म्हणू शकतो.....आज मी ती सारी वाक्ये म्हणू शकतो जी मला केव्हापासून म्हणायची इच्छा होती...पण जरा गंभीर होऊन.... “मी आज, ....... तसा गंभीर हा शब्द ही मला आवडतो... “गंभीर”...काय शब्द आहे नं....नाही पण आधी समस्या... “आज माझ्यासमोर एक समस्या उभी आहे.....मी दु:खी आहे....कारण या भयानक समस्येने मला ग्रासून टाकलंय...काय होणार आता माझं? O ho, माझ्या मनात आत्महत्येचा विचार तर डोकावत नाहीये नं? ...ही तर समस्या आहे....कुठाय, माझा चाकू कुठाय?” झालं.....आता समस्येकडे वळूया.....नको नाही तर....समस्या नको, नाही का? .... तुम्हाला आत्ता माझी समस्या कळणार नाही.....तुम्ही म्हणाल की ही कसली समस्या....पण बाबांनो, माझ्यासाठी ही समस्या आहे...पण आत्ता समस्या नको तर पहिल्यापासून सुरुवात करुया.........लढण्यापासून! हल्ली मी लढतोय हो.. आत्ता सुद्धा माझी लढाई सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माझी ही लढाई सुरु आहे. माझ्या असं लक्षात आलंय की ही लढाई जर स्वतःशीच असेल तर मग मी ही लढाई फारच पूर्वी सुरु केलीये. खरं तर जेव्हा मला अक्कलदाढ आली नं तेव्हाच मी लढायला सुरुवात केली. आता ही अक्कलदाढ सुद्धा साधारणपणे ज्या वयात उगवते, त्यापेक्षा दहा-एक वर्षं उशिराच उगवली. त्याच सुमारास माझ्या लक्षात येऊ लागलं की मी असा एक माणूस आहे जो फारच कमी लोकांना आवडतो. कमी म्हणजे अगदी २ – ४ जणांनाच. त्यातली एक आहे माझी आई. कारण तिला मला ओरडण्याची आणि माझ्यावर वैतागण्याची इतकी सवय झालीये की आता ती माझ्याशिवाय राहू शकत नाही. जेव्हा मी काही करतो......म्हणजे एखाद काम........ते झालं की मी हा असा तय्यार होतो....आईचे चित्र विचित्र चेहरे बघायला....त्या सुरकुतलेल्या चेहेर्यावरच्या आणखीन दाट होणाऱ्या सुरकुत्या आणि तिचा तो हात असे उंचावून आपला कृश देह विशाल करण्याचा प्रयत्न......आई चे हे सगळे नृत्यप्रकार आता माझ्या चांगल्या परिचयाचे झालेत. आम्ही दोघं एकमेकांना खूप आवडतो. तसं पाहिलं तर मी अगदी सामान्य शरीरयष्टीचा माणूस आहे...पण मनात आणलं तर मी थोडा उंच दिसू शकतो...जरा तंग कपडे आणि रघुचे हिल्सचे बूट घालून....अनेक जण म्हणतात की मी जेव्हा रघुचे बूट आणि लाल रंगाचा कचकचीत शर्ट घालून बाहेर पडतो तेव्हा मी तसा बरा दिसतो. तसं सर्वांनाच माहित्ये की मी प्रत्येक गोष्ट बरी करतो. शाळेत असताना जेव्हा परीक्षेचा निकाल लागायचा आणि लोक आईला विचारायचे, तेव्हा आई नेहेमी म्हणायची की बरा लागलाय त्याचा रिझल्ट! मी बरा जन्माला आलो, बरा वाढलो. खरं तर मी चांगलं आणि वाईट याच्या बरोब्बर मधे जो बिंदू असेल ना त्यावर असतो नेहेमी. ज्याला तुम्ही सगळे “शून्य” म्हणाल, मी त्याला “बरा” म्हणतो. एकदा तर शाळेच्या क्रिकेट टीममधे मला घ्यावं की न घ्यावं यावर चांगला २ तास वाद झाला. आयुष्यात पहिल्यांदाच मला मी खूप महत्वाचा आहे असं वाटलं. या वादात, एका बाजूचे लोक म्हणत होते की याला टीम मधे घ्यायला हरकत नाही कारण तो काही वाईट खेळत नाही. तर दुसऱ्या बाजूची मंडळी म्हणत होती की याला टीम मधे घेऊ नका कारण हा चांगला ही खेळत नाही. शेवटी मी उत्तर दिलं....म्हटलं, “सर....सर, मी बरा चं खेळतो.” कोणाला काही कळलंच नाही. अरे, त्यांना शब्द सापडत नव्हता मी कसं खेळतो हे सांगायला...म्हणून मी सांगितलं की “बरा”...मी बरा खेळतो...तर त्यावर सगळे जण माझ्यावर तुटून पडले...म्हणे बरा काय बरा...बरा म्हणजे कसा....बरा वगैरे असं काही नसतं...तेव्हापासून ते आजतागायत मी लोकांना क्रिकेट खेळताना फक्त पहात आलोय...माझी अंगयष्टी पाहून भले भले गन्डतात. अनेकांना असं वाटत असेल की याला नीट धावता तरी येईल का? पण मग मी सर्वांना आश्चर्याचा धक्का देतो...कुठलाही खेळ असुदे...नवा-जुना..मी बरा खेळून दाखवतो...पण माझ्या समस्येची सुरुवात इथूनच होते. मी त्या, मघाशी म्हटलं ना त्या बिन्दुपलीकडे जाऊच शकत नाही. मी पहिल्याचं दिवशी बरा खेळून दाखवतो आणि मग वर्षानुवर्षं मी तसाच खेळतो.....”बरा”. आई सांगते की लहान असताना मी चांगला गब्बू(जाडा) होतो. लोक म्हणायचे की जन्मल्या जन्मल्या आपल्या बापाला गिळला म्हणून एव्हढा गब्दुल आहे. मला जेव्हा जेव्हा ही गोष्ट आठवते नं तेव्हा तेव्हा मी खूप हसतो...आपल्या बापाला गिळला ....गुळूक्क...गुळूक......गुप्प आणि हुप्प... गब्बू....! पण मग नंतर हळू हळू मी बारीक होत गेलो...त्याचं कारण आई सांगते की मी लहानपणी रिन साबण खाल्ला होता...बिस्कीट समजून ...लपा लपा चाटला......मग चार पावलं चाललो न चाललो आणि धपकन खाली पडलो. तेव्हा आईच्या लक्षात आलं की हा बेशुद्ध पडलाय. आई सांगते, नेमका त्याच सुमारास तिने “मदर इंडिया” सिनेमा पाहिला होता. तिने मला कडेवर घेतलं आणि ती हॉस्पिटल च्या दिशेने धावत सुटली. मी मदर इंडिया नाही पाहिलाय पण आई धावत का सुटली? खरं तर माझ्या आईला “आई” ही भूमिका एकदा जीव तोडून साकारायची होती...तशी तिने ती तेव्हा साकारली...१.५ किलोमीटर अंतर ती माझ्यासारख्या ताज्या, तरारलेल्या जाडजूड मुलाला घेऊन धावली. घामाघूम झाली बिचारी. डॉक्टर तिला ओरडले. म्हणाले, तुम्ही धावल्यामुळे तुमच्या मुलाने खाल्लेल्या रिन साबणाचा फेस आता चहूकडून बाहेर येऊ लागलाय. आई सांगते, २ मग पाणी काढलं डॉक्टरांनी माझ्या पाठीमधून. मग ते म्हणाले की काळजी घ्या..खूप अशक्त झालाय हा.....अनेक वर्षं याला जपावं लागेल आता.....दहा वर्षांचा होईपर्यंत याच्या डोक्याला मार लागता कामा नाही...वगैरे... एक शक्यता अशी आहे की कपडे धुवायचा साबण खाल्ल्यामुळेच मला अक्कलदाढ उशिरा आली. बर, मला सांगा की कसं कळत की अक्कल आली? तो काय बल्ब आहे का की बटण दाबल आणि म्हटलं “अरे वा, आला लाईट – अरे वा, आली अक्कल! कसं कळत कसं, सांगा नं? हा प्रश्न एकदा पुंडलिक ने मला विचारला. मला वाटलं तो माझी अक्कल तपासून बघतोय. मी घाबरलो. मी फार विचार नाही केला, केला असता तर त्याला वाटलं असतं की मला अक्कल नाहीये. अगदी काही क्षणांत मी उत्तर दिलं, म्हटलं, की “जेव्हा तुम्हाला पूर्वी केलेल्या गोष्टी मूर्खपणाच्या वाटू लागतात तेव्हा असं समजावं की आपल्याला अक्कल आलेली आहे”. पुंडलिक हसला. मला लगेच वाटलं मी काहीतरी चुकीचं बोललो. मग मी घाईत पुढे म्हटलं की “आणि त्याची जाणीव आपल्याला दाढेच्या जवळ अशी एका कोपर्यात कुठेतरी होते”. बापरे, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात इतका शरमिंदा कधी झालो नव्हतो. पण तो हसला, पुन्हा हसला आणि इतका हसला की मला दरदरून घाम फुटला. मग त्याने त्याचं उत्तर ऐकवलं, बाप रे...कसलं भारी उत्तर होतं ते...एक एक असा पाहेलवानासारखा जड शब्द माझ्या कमकुवत डोक्यावर पडत होता...धम धम धम.... तो साधारण २ तास सतत बोलतच राहिला. मला २ तास बोलणं अशक्य आहे पण तुम्हाला मुख्य मुद्दे सांगतो....तो म्हणाला.... (.....कविता...)... सुंदर फूल थर थर थरारलं... तुझ्या माझ्या कहाणीत, समजा एक भुंगा आला... समजा दाढ दुखू लागली. दातातून आला हात, पायांचा झाला थरकाप, थर थर थर थर थर थर थर थर. मग एक कलंदर, बसला सायकलीच्या चाकावर, चाक झालं पंक्चर... गुडघ्यात सगळी अक्कल. गुडघ्याच्या डोक्यात, फिरतोय जुनाट पंखा गर् गर् गर् गर् गर् गर् गर् गर्. नाकापेक्षा मोती जड बेडकाचा नातू हत्तीचा दात अकलेची दाढ तोंडातला घास रात्रीचा चंद्र सकाळचा सूर्य उगवला जेव्हा.... चिमण्या सगळ्या उडून गेल्या फर फर फर फर फर फर फर फर..... त्या दिवशी पुंडलिक माझ्यासमोरून कधी उठला, रात्र कधी झाली, सकाळ कधी झाली मला काहीही कळलं नाही. आता माझ्या आयुष्याचं एकमेव ध्येय होतं- पुंडलिकला असं काहीतरी बोलून दाखवायचं की तो चाट पडेल. मला त्याला घाम फुटलेल्या अवस्थेत पहायचं होतं. तसा हा पुंडलिक सुद्धा विचित्रच माणूस आहे बर का! तो स्वतःचा वाढदिवस साजरा करत नाही. कारण काय तर म्हणे “मी जन्मलो नाही, मी प्रकटलो.” माझ्या दृष्टिने तर तो प्रकटच झाला होता. तो माझ्या आईचा भाऊ...अचानक एक दिवस आमच्याकडे रहायला आला. माझा विश्वासच बसेना. अरे, इतकी वर्षं मी माझ्या आईला ओळखतोय, माझ्याशिवाय तिचं कोणी आपलं माणूस असू शकेल?माहित नव्हतं. हा पुंडलिक स्वतःला कवी म्हणवतो. महान कवी! आणि मला महान श्रोता. कारण मी एकटाच होतो नं. पण मी मात्र खुश होतो हां कारण त्याने त्याची पहिली कविता मला ऐकवली तेव्हापासूनच, त्याचं माहित नाही पण मी मात्र महान होत गेलो. पण आमच्यातलं हे कवी आणि श्रोत्याच नातं थोडं उलटं होतं. प्रत्येक कविता ऐकवून झाली की पुंडलिक माझं कौतुक करू लागायचा. कारण त्याला माझ्या चेहेऱ्यावरचा चाट पडल्याचा भाव फारच आवडायचा. माझ्यापाशी तशीही हावभावांची वानवाच होती पण हा चाट पडल्याचा हावभाव मात्र मी पुंडलिकाच्या समोर नेहेमी दाखवायचो. कारण तो जे काही बोलायचा त्यातलं ९० टक्के मला काही कळायचंच नाही. आणि जे काही कळायचं ते सांगायला मी घाबरायचो. पुंडलिक माझ्यासमोर अनेक वेळा रडलाय. देव जाणे काय पण काहीतरी दु:ख्ख होतं त्याला. पण जेव्हा तो माझ्यासमोर रडायचा तेव्हा मला जाम हसू यायचं. मला वाटतं पुंडलिकला स्वतःच रडणं खूप लाजिरवाणे वाटायचं. त्यामुळे तो आपलं रडू फारच विचित्र पद्धतीने दाबायचा. शरीर एका विशिष्ट प्रकारे घट्ट ताणून तो आपला चेहरा माकडासारखा मिचकावायचा आणि असा किरटा आवाज काढायचा इ...इ...इ... त्याचं त्याच्या आईवर फार प्रेम होतं. तो म्हणायचा की मी शेवटपर्यंत आईजवळ राहिलो. बहुदा माझ्या आईला तिची आई आवडत नसावी. काय माहित पण पुंडलिकनेच मला असं सांगितलं होतं. आईवर प्रेम असणं – हे काय असतं मी आजवर समजू शकलेलो नाही. मी जेव्हा माझ्या आईकडे पहायचो तेव्हा मला वाळलेल्या लाकडासारखी एक बाई दिसायची जी चुपचाप घरात काहीनाकाही काम उकरून काढून करत रहायची. विचित्र वाटतं नाही? हे असं एकाच घरात वर्षानुवर्षं सतत काम करत रहायचं...मला तर काही वेळा वाटायचं की हे घर म्हणजे घर नाहीच आहे – एक होडी आहे... तिला जागोजागी भोकं पडलीयेत. माझी आई या होडीच्या मधोमध भांडे घेऊन बसलीये आणि सतत पाणी काढून बाहेर फेकत्ये. (मुंग्या दिसतात, मुंग्यांबरोबर खेळतो, आणि परत उठतो.) पुंडलिक म्हणायचा, “तुझी आई खूपच आळशी आहे रे”. अरे? असं काय म्हणतोय हा? तो नेहेमीच असं काहीतरी बोलून निघून जायचा. आणि मी आपला विचार करत बसायचो. पण हळू हळू माझ्या लक्षात यायला लागलं की ती मदर इंडियाची घटना वगळता मला वाटत खरंच माझी आई आळशी आहे. माझ्या बारशापासूनच ही गोष्ट सिद्ध होत्ये. तिने माझं नाव राजू ठेवलं ... आता राजू हे नाव भारतातल्या साधारण दर तीसऱ्या माणसाचं असतं. आणि वर शाळेत नाव घालताना हिच वात्सल्य जागृत झालं आणि तिने राजूला पुढे वाढवून जोडलं “राजकुमार”..! आई सांगते की शाळेत नाव घालताना तो तिथला क्लार्क माझ्याकडे बघून सारखा हसत होता. तिचं म्हणणं होत की माझा चेहराच तसा आहे. माझं तर असं म्हणणं आहे की जगातल्या प्रत्येक माणसाला स्वतःचं नाव स्वतः ठेवण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. माझी आई ही एक गूढ स्त्री होती हे फक्त मलाच माहित्ये. तिने कपाटातून लाल रंगाची रिबीन काढली की समजावं ”आता वेळ झालेली आहे”. ती लाल रिबीन बांधून आई बाहेर निघून जायची. तिला एक छंद होता. तिला एकटीने जाऊन सिनेमे बघायला फार आवडायचं. आणि ते सुद्धा धार्मिक नव्हेत तर रोमान्स आणि मार-धाडीचे. रोमान्सचं माहित नाही पण बहुदा या मार-धाडीचा बऱ्यापैकी परिणाम तिच्यावर दिसू लागला होता. तसले सिनेमे पाहून वाढत्या वयाबरोबर ती पुरुषी दिसायला लागली होती. तिला चक्क दाढी-मिशा फुटल्या होत्या. नंतर नंतर तर ती मला ओरडताना म्हणायची, “ कुत्ते, मै तेरा खून पी जाऊंगी.” त्याच वेळी पुंडलिकाने मला एक पुस्तक दिलं.. माक्झीम गोर्कीच “मदर”. माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही. आत्तापर्यंत मला असं वाटायचं की जगातल्या सगळ्याच आया या एका विशिष्ट नियमाप्रमाणे एकसारखंच वागतात. अरे, पण हे – हे काय होतं? पुंडलिक म्हणाला की ही खरी गोष्ट आहे. मी विचार करायला लागलो..अशीसुद्धा आई असू शकते? मग मला आठवलं की पुंडलिक मला म्हणाला होता की त्याचं त्याच्या आईवर प्रचंड प्रेम होतं. त्यामुळे आता फक्त आणखी एका आईबद्दल मी जाणून घेऊ इच्छित होतो...पुंडलिकची आई. मी पुंडलिकला विचारलं की तुझी आईसुद्धा गोर्कीच्या मदरसारखी आहे का रे? तर या प्रश्नामुळे, पुंडलिकच्या पोटात धुमसत असणारा ज्वालामुखी एकदम जागृत झाला. तो बोलायला लागला...बोलतच राहिला. तो अशी काही उदाहरणं देऊ लागला आणि असे काही एकेक शब्द वापरायला लागला की त्याची ती गोष्ट मला मनोरंजक वाटत होती पण त्यातलं कळत मात्र काहीच नव्हतं. मग मी माझं ब्रम्हास्त्र काढलं...तोच तो चाट पडल्याचा भाव... तो बघून मात्र पुंडलिक जरा मंदावला आणि तो घोगऱ्या आवाजात हळू हळू बोलायला लागला आणि मला मग जरा कळायला लागलं. तो सांगत होता की “ मी आईच्या शेवटच्या दिवसांमध्ये वाचन-लेखन, घराबाहेर जाणे सगळं बंद केलं होतं. मी फक्त आईजवळ असायचो, तिला गीता वाचून दाखवायचो, अनेक वर्षं मी घराबाहेर पडलो नाही. गीता ऐकता ऐकताच तिचा मृत्यू झाला. ती अचानक गेली. मला एकदम विचित्र वाटलं. मी रिकामा झालो. मला काही कळलच नाही. अचानक तिचा हसरा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला आणि त्या चेहेऱ्याचं एक झाड झालं.... त्याच झाडाखाली बसून मी लिहायला सुरुवात केली.” (कविता) उन्हाच्या काहिलीने चेहरा करपला, सावली तळपायाखाली सरकली.. शरीर पाणी ओकायला लागलं... आणि तो वृक्ष जवळ आला.. त्याच्याच पदराखाली वाढलो मी. त्या मायेच्या ओलाव्याने तरारून हिरवा झालो मी ही. तुमचा विश्वास नाही बसणार, या जंगलातल्या एका झाडाने मला पाणी घातलं. “आई” म्हणतो मी त्याला. जेव्हा रात्रीत कोलाहल शांत होतो.. भीतीमुळे झोप रात्रीपेक्षा छोटी होते. आपलाच डरपोकपणा आपली सुंदर स्वप्नं मोडायला लागतो... तेव्हा तिची बोटं कपाळावर फिरतात...हलकेच... आणि मला झोप येते... हलकेच...! आणि तो झोपला. मी अवाक झालो. बर झालं तो झोपला ते, कारण मला त्याच्यासमोर रडायचं नव्हतं. मी धावत त्याच्या खोलीबाहेर आलो आणि मला “ती” दिसली. तीच ती, वाळलेल्या लाकडासारखी दिसणारी स्त्री जी आता पुरुषी दिसू लागली होती. ती हातात भांडं घेऊन सतत बाहेर पाणी फेकत होती. मी वरपासून खालपर्यंत थरथरायला लागलो. मला वाटतं पहिल्यांदा मला माझी आई दिसली. मी धावत तिला जाऊन मिठी मारली आणि एकदम माझ्या तोंडून निघालं....... “पेलागेया निलोबना - माय मदर”... सटाक - आवाज आला. माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले.... पुढे अनेक दिवस तिची माझ्या गालांवर उमटलेली, वात्सल्याने भरलेली बोटं मला जाणवत राहिली. पण या घटनेने मी हरलो नाही. मी काही तिला मदर म्हणायचं सोडलं नाही. अर्थात, मी मदर मनात म्हणायचो आणि आई मोठ्ठ्याने म्हणायचो. मदर आई मदर आई असं...आणि तसंही माझ्या आणि आई मधले संवाद अनेक वर्षांपूर्वीच ठरून गेलेले होते. कोणत्याही घटनेचा आमच्यातील या ठरलेल्या संवादांवर परिणाम होत नसे. एकदा पुंडलिक म्हणाला होता की तुझं गाव आणि तू एकसारखेच...तुमच्यात काही फरक नाहीये. आणि तो निघून गेला. अरे? असं काय म्हणाला हा? मी विचार करायला लागलो आणि बऱ्याच वेळाने माझ्या लक्षात आलं की खरंच आहे हे.. माझं गाव हे तसं गाव पण नाहीये आणि पूर्णपणे शहर पण नाहीये. म्हणजे इथे श्रीमंती वाहत नाहीये पण कोणी भुकेकंगाल पण नाही. हे इतकं महत्वाचं नाहीये की त्याला देशाच्या नकाशात स्थान मिळेल पण म्हणून हे नाहीच आहे असंही नाहीये. तसं पाहिलं तर इथले लोक काही करू इच्छित नाहीत पण सगळे शेवटी काही नं काही करतातच. या गावाचं बर चाललंय...म्हणजे माझ्यासारखं..मी कसा आहे...बरा. पुंडलिक म्हणतो की हे गाव सांडलेल्या लोकांचं आहे. म्हणजे रेतीचा ट्रक जाताना कशी थोडी थोडी रेती सांडते मागे...तशा मागे राहिलेल्या,सांडलेल्या लोकांचं मिळून हे गाव तयार झालंय. माझं गाव हायवे आणि जंगलाच्या बरोब्बर मधे होतं. पण माझं घर हायवेच्या बाजूला होतं. रस्त्याच्या पलीकडे एका धाब्यावर चित्र-विचित्र चेहेर्यांची माणसे जोरजोरात हसत-खिदळत जेवायची. असं वाटायचं की या माणसांचे आवाज आता त्यांच्या गाड्यांसारखे झालेत. मी दिवसा कधी तिथे फारसा जातच नसे. माझं काम तर पहाटे ५ वाजता असायचं. मी खरं तर ट्रकच्या मागे काहीतरी लिहायला जायचो. मला इतकंच माहित होतं की हे ट्रक्स संपूर्ण देशातल्या प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात जागोजागी जातात. मी ट्रक्सच्या मागे छोट्या छोट्या अक्षरात लिहीत असे. कोणासाठी माहित नाही. माझ्या दृष्टिने ते मी अंतराळात संदेश पाठवल्यासारखं होतं. मला अगदी खात्री होती की कोणी राजू, राजकुमार, बंटी, पिंटू, छोटू, चिंटू, राकेश सारखा सामान्य मुलगा माझ्यासारखाच सक्काळी पाच वाजता उठून ते वाचत असणार. कारण मी लिहिलेलं कधीच माझ्याकडे परत आलं नाही. याचा अर्थ सरळ आहे, कोणीतरी आहे जे मी लिहिलेलं वाचून मग खोडून टाकत, दुसऱ्या कोणी ते वाचू नये म्हणून. आमची मैत्री बऱ्यापैकी वाढली होती. मी त्याला माझं सगळं काही सांगत असे पण अर्थात थोडक्यात आणि चलाखीने शब्द फिरवून. उगाच कोणीतरी वेगळाच हे वाचून हसला तर? आणि पोलीस वगैरे घरी आले तर? कारण मी नं रघू, आई, पुंडलिक आणि राधे बद्दलची सगळी गुप्त माहिती यात लिहिली होती. आणि पोलिसांना कळू नये म्हणून मी हुशारीने खूप आधीच ट्रक वर लिहिलं होतं की मित्रा, आता रघु = हिरो, पुंडलिक = कवी, राधे = गांधीजींची लाठी आणि आई = भांडे वाली बाई. मी पहाटे ५ वाजता का उठायचो याची २ कारणे आहेत..पहिल म्हणजे ट्रकवरून संदेश पाठवायचा आणि दुसरं म्हणजे राधेशी भेट कारण राधे रोज सकाळी ५ वाजता माझ्या घरासमोर यायचा. त्याचं नाव खरंच राधे आहे की नाही हे सुद्धा मला माहित नाही. कारण माझ्याकडे पाहिलं की तो राधे राधे म्हणायचा आणि मी सुद्धा मग त्याला उत्तर म्हणून राधे राधे म्हणायचो. आम्ही दोघंही एकमेकांसाठी राधे होतो. मी त्याला सोनेवाला बाबा म्हणायचो...कारण तो सोन वेचायचा. आमच्या घरात सोन्या-चांदीची २ छोटी दुकानं होती. आम्हांला त्यांचं भाडं मिळायचं. राधे रोज आपल्या जवळच्या लोखंडाच्या दात्याने सोनं वेचत बसायचा. ते करत असताना त्याच्या शरीराच पांढर गाठोडं व्हायचं. आणि मला आपलं ते सारखं डूगु डूगु हलताना दिसायचं. काम तो अगदी गप्प राहून करायचा. मला तर त्याच्या फक्त श्वासांचा आवाज यायचा. राधेला मी अनेक वर्षं ओळखतोय. मला वाटतं त्याचं वय थांबलंय ... बहुदा ते वाढायची शक्यताच नाहीये. तो अनेक वर्षं वृध्दचं आहे. माझा तर विश्वासच नाहीये की राधे कधी लहान मूल असला असेल. तो गावाबाहेर एकदाच गेला होता आणि तो त्याचा पहिला आणि शेवटचा प्रवास होता. तो गांधीजींना पहायला - फक्त पहायला साबरमती आश्रमात गेला होता. हेच त्याच्या आयुष्यातलं एकमेव कर्तुत्व होतं आणि त्याबद्दल त्याने मला जवळ जवळ ५० वेळा तरी ऐकवलं होतं. प्रत्येक वेळी जेव्हा तो गांधीजींना भेटल्याची घटना सांगतो तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीत, गांधीजी राधेशी वेगळं बोलतात. बऱ्याच वेळा गांधीजींनी फक्त नमस्ते म्हटलं आणि राधे परत आला. अनेकदा राधे गांधीजींबरोबर बसून जेवलाय. अनेकदा गांधीजींना त्याला काहीतरी सांगायचं होतं पण त्याला गावी लौकर पोचण्याची घाई होती... आणि एकदा तर गांधीजी त्याला म्हणाले की “राधे, मी आता थकलोय रे, आता तूच गांधी हो” सोनं वेचत असताना मी राधेशी फार नाही बोलायचो. पण एकदा मी त्याला विचारलं की तू सोन का वेचतोस तर तो म्हणाला की त्याला मरण्यापूर्वी आयुष्यात एकदा वैष्णोदेवीच्या दर्शनाला जायची इच्छा होती. मी विचारलं किती पैसे लागतील तुला तिथे जाऊन यायला. तर तो म्हणाला कमीत कमी हजार तरी लागतील. मग मी म्हटलं की तुझ्याकडे हजार रुपये नाहीयेत का तर तो म्हणाला आहेत नं....अरे? हे काय, गंमतच आहे. मी त्याला म्हटलं की जर तुला वैष्णोदेवीला जायचंय आणि तुझ्याकडे पैसेही आहेत तर मग तू का जात नाहीयेस? राधे गप्प झाला. विचित्र वाटलं मला त्याचं ते गप्प बसणं म्हणून मग मी काही बोललो नाही. राधे सावकाश सांगू लागला, “मी गांधीजींना भेटल्यानंतर थोड्याच काळात त्यांचं निधन झालं आणि मला फारच दु:ख्ख झालं. आमच्या गावात गांधी पार्क आणि गांधीजींच्या दगडी पुतळ्याची स्थापना झाली नं तेव्हा मला वाटलं की मरते वेळी गांधीजींनी नक्कीच म्हटलं असणार की माझा पुतळा राधेच्या गावी जरूर उभारा. मी तासंतास त्यांच्या पुतळ्यासमोर उभा राहायचो, गांधीजी सुध्दा तासंतास माझ्याकडे पाहत राहायचे. मला वाटायचं की ते मला काही सांगू पहातायत पण पार्क मधे गर्दी असल्यामुळे ते सांगू शकत नाहीयेत. मग एका रात्री ते माझ्या स्वप्नात आले...म्हणजे खरं तर ते नाही आले, त्यांनी मलाच त्यांच्या आश्रमात बोलावून घेतलं. मी पाहिलं, गांधीजी होते आणि खूप गर्दी होती. त्यांनी मला पाहिलं आणि म्हणाले, “राधे.....,” मी नमस्कार केला. त्यांनी मला छातीशी कवटाळलं आणि माझ्या कानात हळूच म्हणाले की “बेटा, मी नाही जाऊ शकलो पण तू एकदा वैष्णोदेवीला जा आणि देवीमां ला भेटून ये. मी थक्क झालो. हे काय सांगतायत गांधीजी मला? मी त्यांच्याकडे पाहतो तो काय..गांधीजी कबुतर होऊन उडायला लागले.”.....अचानक मला जाग आली, मी पार्क मधे गेलो आणि पाहिलं की तेचं कबुतर गांधीजींच्या पुतळ्याच्या डोक्यावर बसलंय. स्वप्नं खरंच होतं. अगदी खरं. तोपर्यंत मी फक्त एकदाच गावाबाहेर गेलो होतो त्यामुळे जरा भीती वाटत होती. त्या वेळी नाही जाऊ शकलो आणि आता मला जायचं नाहीये. कारण मी माझं आयुष्य कसंही जगलो असेन पण एका आशेवर जगलो की मी एकदा तरी वैष्णोदेवीला जाऊन येईन. अगदी नक्की जाईन. पण आता जर मी गेलो नं तर मग उरलेले दिवस कसे काढू? ज्या आशेवर मी जगलो ती आशा आता इतकी मोठी झालीये की जणू माझा मुलगाच आहे ती......आता या वयात माझ्या या तरण्याबांड झालेल्या मुलालाच मारून टाकणं कसं शक्य आहे मला? (मुंग्या दिसतात, मुंग्यांबरोबर खेळतो, आणि परत उठतो.) मला आठवतंय आमच्या शाळेत मी गांधीजींविषयी वाचलं होतं. आमचे मास्तर – गावी सरांना मास्तर म्हणतात ना...ते इतकं निरस शिकवायचे. गांधीजींबद्दल आम्हांला शिकवण्यात ना त्यांना मजा यायची आणि शिकण्यात ना आम्हांला... विशेष करून मला...कारण तोपर्यंत मी रघूच्या विशाल आणि चमचमणाऱ्या विश्वात प्रवेश केलेला असायचा. रघु...रघु....रघु....रघु नाहीच तो एक चमत्कार होता. तो खूप देखणा होता आणि सगळे त्याला घाबरायचे कारण सगळ्यात पहिल म्हणजे त्याचे वडील पोलीस होते आणि आमच्या गावी बदली होऊन आले होते आणि दुसरं म्हणजे अख्ख्या गावात फक्त रघुलाच थोडं-फार इंग्रजी बोलता यायचं. आमचे मास्तर सुद्धा त्याला घाबरायचे कारण त्याच्या इंग्रजीला हिंदीच्या मास्तरांकडे उत्तर नसायचं. माझ्यासाठी रघु इयत्ता ९ वी ते ११वी “कृष्ण” होता ज्याच्या बासरीमुळे माझ्यासारख्या अनेक गायी त्याच्या मागे मागे जायच्या. माझ्यासाठी तो हरीण, सिंह आणि घोडा याचं एक अजब मिश्रण होता. एक तर तो नेहेमी वर्गात उशीरा यायचा आणि तो यायच्याआधी त्याचा आवाज यायचा....घोड्यासारखा....टाप टाप टाप...त्याचे हिल्सचे उंच बूट....ते घालून तो असा वर्गाच्या दरवाजात प्रकट झाला की सिंहाच्या आयाळीसारखे त्याचे लांब केस बघून मास्तर स्वतःच उठून उभे राहायचे.... तो एकदम कडक कपडे घालायचा. वेगळाच होता तो. सांर गाव एकीकडे आणि रघु एकीकडे...तो एकदम रंगीला होता. आणि माहित्ये, तो कुणा भारतीय नाही तर एका परदेशी देवाला मानायचा. त्याने त्याच्या घरात चारी बाजूंना या देवाच्या तसबिरी लावून ठेवल्या होत्या. तो सारखं म्हणायचा....हा देव आहे....हा देव आहे...! एकदा तो सांगत होता की त्याच्या या देवात अशी शक्ती आहे की ते झोपायला जाताना जेव्हा दिव्याचं बटण बंद करतात तेव्हा त्यांना झोप आधी लागते, दिवा नंतर बंद होतो. एकदा मी त्याला त्याच्या कळपातल्या एका गायीसारख हंबरून विचारलं की रघु, तुझ्या देवाचा धर्म कुठला आहे? यावर तो हसला, खूप हसला...बराच वेळ हसून झाल्यावर त्याने एक इंग्रजी शब्द उच्चारला...मला नाहीच कळला. रघूच आणि माझं नातं हे कृष्ण आणि त्याच्या गाईसारखंच होतं. आम्ही कधीच एकमेकांशी समोरासमोर बोललो नाही. माझी हिम्मतच नव्हती तेव्हढी. मी माझ्या त्या ट्रकवाल्या मित्राला रघुबद्दल बरंच लिहिलं होतं. त्या काळात मी घरी फक्त झोपायला जायचो. तहान-भूक विसरलो होतो. मी फक्त रघूच्या मागे मागे जायचो. त्याच्याकडे एक मस्त लाल रंगाची सायकल होती. आपले हिल्सचे बूट आणि लाल रंगाचा कचकचीत शर्ट घालून जेव्हा रघु ती सायकल चालवायचा ना...तेव्हा काय दिसायचा माहित्ये...! त्याच्या सायकलीची घंटा ऐकायला मी सारखा त्याच्या मागे धावायचो. तो आपली सायकल लावून कुठे गेला की मी हळूच ती घंटा वाजवायचो. वेगळीच वाजायची ती...आमच्या गावातल्या इतर सायकलींसारखी “टंग टंग” नाही, “ट्रिंग ट्रिंग” अशी वाजायची. पण एक दिवस त्याने शाळेत घोषणाच करून टाकली की तो शाळा सोडून चाललाय. कारण त्याच्या बाबांची बदली शहरात झालीये. मी तर वर्गातच रडायला लागलो आणि चांगला मोठ्याने...ओरडून ओरडून म्हणत होतो...की “नाही रघू नाही .....तू मला सोडून नाही जाऊ शकत. तू असं कसं वागू शकलास माझ्याशी? नाही नाही”....मी गप्प झालो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अख्खा वर्ग माझ्याकडे पाहून फिदीफिदी हसत होता. मला सहन नाही झालं. मी सरळ वर्गाबाहेर गेलो. पण जाण्यापूर्वी एकदाच मला रघुचा चेहरा पहायचा होता. तो पण मला हसत असला तर? पण माझी हिम्मत नाही झाली. मला माझं हे वागणं फारच वाईट आणि लाजिरवाणे वाटू लागले. सकाळीच सकाळी मी राधेला मिठी मारून खूप रडलो. राधेने समजावलं मला. म्हणाला...”उगी उगी, जाऊदे रे. होतं असं कधी कधी, रडायचं नाही.... मी जेव्हा गांधीजींचा निरोप घेत होतो तेव्हा त्यांनासुद्धा सहन होईना माझं जाणे...त्यांच्या डोळ्यात अश्रू होते”. अरे हे काय? म्हणजे राधेला कळलंच नव्हतं मला काय म्हणायचंय ते...मला पहिल्यांदाच राधेचा राग आला आणि मी तडक रस्त्याच्या पलीकडे निघून गेलो आणि एका ट्रकजवळ उभा राहिलो...कितीतरी तास मी तसाच उभा होतो. मी शाळेत जाणे बंद केलं. काही दिवसांनी एक हवालदार आला घरी. मी घाबरलो. माझ्या डोक्यात लगेच माझी ट्रकवाली गंमत आली...गंमत कसली...चूकच ती. मला वाटलं की झालं, मी आता पकडला गेलोय. आता सर्वांना कळणार की मी त्यांच्याबद्दल काय विचार करतो, मला काय वाटतं....मला तुरुंगात जायची भीती नव्हती वाटत पण हे असं सगळ्यांना समजणे की आपल्याला त्यांच्याविषयी काय वाटतंय...हेच किती भीतीदायक आहे. सर्वांसमोर अगदी नागडं झाल्यासारखंच नाही का? मी घाबरत घाबरत त्या हवालदारासमोर गेलो...म्हटलं.. “मीच तो..राजकुमार..” तो हसला. त्याने मला एक बेग दिली आणि म्हणाला.. “रघुसाहेबांनी जाण्यापूर्वी ही तुम्हाला द्यायला सांगितली होती. अच्छा, येतो” तो गेला. मी ती बेग उघडून बघतो तर काय ... “रघुचे हिल्सचे बूट आणि त्याच्या देवाचा फोटो.” (राजकुमार ब्रूस ली चा फोटो काढतो आणि त्याला साष्टांग नमस्कार करतो) रघुचे बूट मी फार वापरू शकलो नाही कारण मला चावायचे ते. पण माझे पाय सुजेपर्यंत मी ते वापरणं सोडलं नव्हतं. माझे सुजलेले पाय एकदा पुंडलिकने पाहिले. मला वाटलं त्याला वाईट वाटेल आणि तो विचारेल की काय झालं बाबा...पण छे.. त्याने काहीही विचारलं नाही. त्याने माझ्या पायांकडे पाहिलं, हसला, आणि वळून खिडकीच्या दिशेने पहायला लागला...मग हळूच पुन्हा वळला, हसला आणि म्हणाला.... “चपला चावतात ना तेव्हा हे आयुष्य सुद्धा आपल्याला चावत रहातं, आणि चपला चावणं बंद झालं की आपला वेळ जाणंही बंद होतं”. त्या दिवशी पहिल्यांदाच मला खूप एकाकी वाटलं. कारण इथे कोणीच “माझ्याबरोबर” रहात नव्हतं. मला असा एकही प्रसंग आठवत नाही जेव्हा मी काही बोलतोय आणि कोणी ते ऐकतंय. माझ्याकडे बोलण्यासारखं कधी काही नव्हतंच ही गोष्ट वेगळी. पण पुंडलिकसुद्धा कधी माझ्याबरोबर नसायचा. मीच त्याच्याबरोबर असायचो नेहेमी. राधेचं गांधीजी पुराण अजून संपलं नव्हतं. तिथेही मी गप्पच असायचो. आईच्या होडीमधलं पाणी अजून संपायचंच होतं. एक तो ट्रकवाला मित्र मात्र होता ज्याला मी सगळं काही सांगायचो पण तो खरंच तिथे ते वाचत असेल याबद्दल माझ्या मनात पहिल्यांदाच शंका आली. बूट घराच्या एका कोपऱ्यात अनेक दिवस पडून होते. ते कधी आमच्या घराचा एक भाग वाटलेच नाहीत. मग आमच्या घरानेच त्यांना स्वीकारलं...आपला एक भाग म्हणून...आणि हे सत्कार्य माझ्या आईनेच केलं..तिने त्या दोन्ही बुटांच्या कुंड्या केल्या.. मी बघतच राहिलो. मला खूप वाईट वाटलं. अरे ते रघुचे बूट होते, माझ्या रघुचे..पण मी काही बोललो नाही. इतकी वर्षं आमच्यात जे काही संवाद ठरून गेले होते ते उगाच मला मोडायचे नव्हते. (मुंग्या दिसतात, मुंग्यांबरोबर खेळतो, आणि परत उठतो.) तुम्हाला वाटत असेल ना की मी काय करतोय......मी खेळतोय. हो, खरंच मी खेळतोय. एक दिवस काय झालं, असंच घरी बसल्या बसल्या मला एक आगगाडी दिसली...मुंग्यांची आगगाडी..सगळे डबे एकामागून एक, एका तालात चालले होते. मी तिचा पाठलाग केला पण कळतच नव्हतं ही कुठून आलीये आणि कुठे जाणार आहे. पण सगळ्या मुंग्या एका रांगेत चालत होत्या. मी साखरेचे पाच दाणे घेऊन आलो. मग खेळाला सुरुवात झाली. मी घराचा दरवाजा बंद केला ज्यामुळे बाहेरचं जग बंद झालं आणि मी आता खोलीतलं आतलं जग नीट पाहू शकत होतो. मी त्या आगगाडीच्या जवळ साखरेचे दाणे पेरायला सुरुवात केली. पहिले २ दाणे जवळ जवळ, मग तिसरा लांब, चौथा आणखी लांब आणि पाचवा सर्वात शेवटी... दोन-तीन मुंग्या त्या २ दाण्यांजवळ वळल्या तशी ती आगगाडी वळली. मुंग्या पाचव्या दाण्यापाशी पोचल्या की मी आधीचे २ दाणे उचलायचो आणि पाचव्या दाण्याच्या पुढे ठेवायचो. अस मग मी ती मुंग्यांची रेलगाडी कशीही वळवायचो आणि फिरवायचो. खूप मज्जा यायची, वाटायचं की कोणीतरी आहे जे तुमच्या इशाऱ्यावर फिरतंय...फक्त साखरेचे ५ दाण्यांवर......! हा माझा फारच आवडीचा खेळ होता. मी तो रोज खेळायचो. पुंडलिक जेव्हापासून आमच्याकडे आला होता, फारच कमी वेळा बाहेर पडायचा. कधी कधी त्याचा एक मित्र ताराचंद जयस्वाल ला भेटायला शहरात जायचा आणि एका दिवसात परतायचा. मी त्याच्या समोर मुंग्यांचा खेळ खेळू नाही शकायचो. मी गावाच्या बाहेर जात नसे कारण मला राधेने सांगितलं होतं की गावाबाहेर जाण्यात खूप धोका आहे. बाहेर गेलं की जेवण-खाण, माणसं सगळंच बदलतं. पाहिलं नाहीस का तू आपल्या गावाच्या दोन्ही बाजूला शहरं आहेत आणि त्या शहरांतली गर्दी कशी आपल्या रस्त्यावरून धावत असते. पुंडलिक जेव्हा माझ्याशी बोलायचा तेव्हा मला वाटायचं की तो “राजू” असं नाव घेऊन स्वतःशीच बोलतोय. कारण मी कधी कधी मधे उठून जायचो आणि परत यायचो तर काय..हा पुंडलिक आपला राजू राजू म्हणत अजूनही बोलतोच आहे. तो एका विचित्र एकटेपणाचा बळी होता. आणि हे मी नाही म्हणत आहे. मी त्यालाच हे स्वतःशी बोलताना ऐकलंय. एकदा तो एक अजब गोष्ट स्वतःलाच वाचून दाखवत होता. “एक कुत्रा आपलीच शेपटी चावायचा प्रयत्न करतोय. तेव्हा एक कुत्रा-चक्रीवादळ सुरु होतं. जेव्हा या वादळातून कुत्रा कुत्र्याच्या रुपात परत येतो तेव्हाच ते शमता. रिकामपण – तो कुत्रा माझ्या आणि मी त्याच्या डोळ्यात पाहतो”. पुंडलिक सांगतो की एके काळी तो स्वयंघोषित कवी होता. त्याने प्रत्येक प्रकारची कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. दुखी, प्रेमकविता, बालकविता, पर्यावरणावर, दगडांवर, फुलांवर...पण कोणी हिंग लावून विचारलं नाही. नंतर नंतर तर लोक त्याला पाहून पळून जायला लागले. पुंडलिक ओरडून सांगायचा की अहो नाही, मी कविता नाही ऐकवणार...तरी लोक थांबायचे नाहीत आणि जे थांबायचे त्यांना पुंडलिक इकडचं – तिकडचं बोलत एखादी कविता ऐकवायचाच. तो सांगायचा की लोक त्याची चेष्टा करायला लागले होते. ज्या घरात तो घुसायचा तिथून किंकाळ्या, ओरडण्याचे आवाज बाहेरपर्यंत यायचे. पुंडलिकने लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या होत्या. त्यामुळे गल्लीत मुलांनी खेळणं बंद केलं होतं. प्रत्येक मूल पुंडलिक या नावाला घाबरायचं. त्याच्या घरी भाजी, धान्य परस्पर पोचवलं जायचं कारण कोणालाच कुठल्याही निमित्ताने त्याची कविता ऐकायची नसायची...ती छापणं तर दूरच राहिलं. हल्ली, आपली कविता ऐकवल्यानंतर पुंडलिक माझं कौतुक नाही करायचा उलट चिडायचा माझ्यावर. एकदा आपली कविता ऐकवल्यावर मला विचारलं...काय?, आवडली नाही ना तुला कविता? मी म्हटलं... “नाही, छान आहे”. म्हणाला..मग चिडून का बघतोयस?..... अरे? हाच मला म्हणाला होता की मला तुला एक गंभीर श्रोता बनवायचं आहे. आणि तुम्हाला माहित्ये ना की मला गंभीर हा शब्द किती आवडतो. गंभीर...काय शब्द आहे.....पण जेव्हा तुम्ही चाट पडलेले आहात असं दाखवता आणि मग त्यात थोडा गंभीरपणा आणायचा प्रयत्न करता तेव्हा चेहरा हा असाच दिसतो. मी बाबा मनापासून गंभीर व्हायचा पूर्ण प्रयत्न करायचो. (मुंग्या दिसतात, मुंग्यांबरोबर खेळतो, आणि परत उठतो.) एक दिवस मी मुंग्यांबरोबर खेळत होतो आणि अचानक मला असं वाटलं की मी एक मुंगी झालोय. मला विचित्र वाटू लागलं. मला वाटलं की खेळता खेळता माझी बुद्धीसुद्धा मुंग्यांसारखी नाही ना झालीये? त्याच वेळी मला ते साखरेचे दाणे दिसले. बघतो तर काय...ते साखरेचे दाणे आता दाणे नव्हते राहिले....ते पुंडलिक, राधे, आई, रघू आणि तो ट्रकवाला मित्र झाले होते. आणि मी त्यांच्या मागे धावायला लागलो. याचा अर्थ काय? कोणी असं आहे जे माझ्याशी खेळ खेळतंय. पण मी नाही खेळत आहे. म्हणजे मी मुंग्यांशी खेळतो पण मुंग्या माझ्याशी खेळत नसतात. देव जाणे, कदाचित त्याही कोणाशी तरी खेळत असतील पण ते कोणीतरी त्यांच्याबरोबर खेळत नसेल. याचा अर्थ सगळेच सगळ्यांशी खेळतायत. म्हणजे पुंडलिकदेखील माझ्याशी खेळतोय. आता कळेल तुम्हांला की माझी समस्या काय आहे............समस्या........माझ्यासाठी फारच मोठी समस्या आहे आणि त्यासाठीच तर मी हे सगळं करतोय. तर ही समस्या माझ्यासमोर “पुंडलिक”च्या रुपात आली. पुंडलिकला खरं तर आपला एक कविता संग्रह छापायचा होता. कोणी एक ताराचंद जयस्वाल नावाचा शहरातला त्याचा मित्र त्याला या कामात मदत करत होता. मी तर त्याच्या सगळ्या कविता ऐकल्या होत्या. काही काही तर इतक्या वेळा की आजही मला त्या तोंडपाठ आहेत. समस्या खरी सुरु झाली ती पुंडलिक घर सोडून निघाला तेव्हा. तो जाताना मी पाहिलं की त्याच्या एका हातात त्याची कवितांची डायरी, एक पत्र आणि दुसऱ्या हातात माझ्या आईचा फोटो आणि गीता होती. ते सगळं घेऊन तो माझ्याकडे आला. म्हणाला...याच्यावर तुझे दोन्ही हात ठेव...आणि शपथ घे ... घे पाहू शपथ... तुझ्या आईची, या गीतेची, आणि माझ्या कवितांची...की तू माझा कविता संग्रह नक्की छापशील. मी शपथ घेणार त्यापूर्वीच मी पाहिलं की त्याने आपलं सामानही बांधलं होतं. मी विचारलं,” तू कुठे जातोयस पुंडलिक?” कारण आमच्या गावापासून शहर तसं लांब नव्हतं. म्हणजे इतकं सामान बांधण्याइतकं तर नक्कीच नव्हतं. माझ्या प्रश्नाचं पुंडलिकने उत्तर दिलं नाही. त्याचा आवाजही विचित्र होऊ लागला होता. तो सारखा शपथ घे, शपथ घे म्हणत होता म्हणून मी शपथ घेऊन टाकली. विदयेची, धरतीमातेची, कवितांची, गीतेची शपथ....शिवाय स्वतःच्या मनाने आणखी ३-४ जणांच्या शपथा मी उत्साहात घेऊन टाकल्या. माझं काय बिघडणार होतं? कवितासंग्रह पुंडलिकचा...तो छापणार ताराचंद जयस्वाल. मी कोण होतो? खरं तर मी कोणीच नव्हतो पण मला एक गोष्ट कळेना की हा पुंडलिक मला का शपथ घ्यायला लावत होता की तू छाप कवितासंग्रह म्हणून? मुख्य म्हणजे ही शपथ घेऊन मी आता पूर्णपणे या प्रकरणात अडकलो होतो. शपथ घेण्याचा सोपस्कार आटपला तेव्हा पुंडलिकचा चेहरा उजळला. त्याने माझ्या आईचा फोटो आणि गीता एका कोपऱ्यात फेकून दिली. आणि आपलं सामान घेऊन निघाला. दरवाज्यापाशी आल्यावर त्याच्या लक्षात आलं मी त्याला काहीतरी विचारलं होतं...कुठे जातोयस तू पुंडलिक? तो वळला आणि म्हणाला..आधी शहरात जाऊन ताराचंद जयस्वालला हे पत्र, ज्यात मी माझ्या कवितांबद्दल आणि तुझ्याबद्दल सगळं काही लिहिलंय, ते देईन, मग तीर्थयात्रा आणि मग संन्यास. असं म्हणून त्याने मला मिठी मारली आणि हळूच कानात म्हणाला, “ मला तुला काहीतरी द्यायचं होतं, मी गेल्यावर तुला ते मिळेल. धन्यवाद. (येतो म्हणायला जाईल आणि थांबेल..).... नमस्ते.....आणि निघून गेला तो. कवितांबद्दल ठीक आहे पण माझ्याबद्दल का लिहिलंय त्याने पत्रात? त्याला मला काय द्यायचंय? आणि का? मी तर फक्त त्याच्या कविता ऐकल्या होत्या आणि त्यातल्या अर्ध्या तर मला कळल्याच नव्हत्या. ऐकणाऱ्या माणसाचा पत्रात वगैरे उल्लेख करत असतील तर ठीके पण मी तर अडकलोच होतो या प्रकारात. मला या प्रकरणात कसं काय गोवलं पुंडलिकने याचं उत्तर मला काही दिवसांपूर्वी ताराचंद जयस्वालकडून आलेल्या पत्रातून मिळालं. माझा विश्वासच बसेना की पुंडलिक माझ्याशी असा कसा वागला? मान्य आहे मला की मी काही फार कामाचा माणूस नाही..पण मला आशा तऱ्हेने कोणी “कामी आणेल” यावर माझा विश्वास बसेना. (मान्य आहे की मी काही फार उपयोगाचा माणूस नाही पण म्हणून माझा असा उपयोग कोणी करेल यावर माझा विश्वास बसेना). तुम्हांला माहित्ये पुंडलिकने काय केलं? त्याने पत्रात ताराचंद जयस्वालला काय लिहिलं? हे पहा त्यांचं मला आलेलं पत्र. तसं मोठं आहे ते पण मी त्यातले मुख्य मुद्दे सांगतो.......(वाचतो..) “राजकुमार, कवीहृदयाच्या या महान कवीला माझा नमस्कार. तुमच्या कविता वाचून फारच आनंद झाला. पुंडलिकने तुमच्या कवितांबद्दल यापूर्वीच मला सांगितलंय. सगळे जण तुमच्या कवितांची खूपच स्तुती करतायत. पुढच्या महिन्यात संग्रह छापून होईल पण जरा एक अडचण आहे. या संग्रहात एक कविता कमी पडत्ये असं मला नाही आमच्या संपादक महोदयांना वाटतंय. आपण मोठे कवी आहात. हा संग्रह छापला गेल्यानंतर तर मोठ्या मोठ्या कवींबरोबर आपलं नाव घेतलं जाईल. कृपा करून लौकरात लौकर आपण एक कविता लिहून पाठवावी. माझी मुलगी तुमच्या कवितांची दीवानी आहे. लग्नाबाबत आपला काय विचार आहे? पुंडलिक आपलं फारच कौतुक करायचा. मग आता प्रत्यक्ष दर्शन कधी? कवितासंग्रहात आपण आपलं नाव राजकुमारच लिहिणार की काही टोपणनाव जोडणार? जरूर कळवा. आपला, ताराचंद जयस्वाल.” म्हणजे या समस्येने आता भयानक रूप धारण केलेलं आहे. मी का घेतली शपथ?पश्चात्ताप होतोय मला. शपथेचे जाऊदे, माझी स्वतःची अशी इच्छा होती की पुंडलिकचा कवितासंग्रह छापला जावा. पण हा असा? नाही...मी काय नाही केलं म्हणू सांगू....गेले अनेक दिवस मी पुंडलिकच्या पुस्तकांत शोधतोय ...कुठेतरी काही ४ ओळी, २ ओळी, निदान एक ओळ .. काही लिहून ठेवलं असेल....पण छे. मग मी पेन हातात घेतलं आणि पुंडलिक सारखं लिहायचा प्रयत्न केला.....थर थर, फर फर, कर कर....यापलीकडे मी जाऊच शकलो नाही. खरं तर माझ्या आयुष्यात असं काहीही घडलेलं नाही ज्याबद्दल मी लिहावं किंवा त्यासाठी लढावं....आत्तापर्यंत घडलेलं मला सगळं आठवतंय पण खरंच सांगतो ते सगळं काहीही न घडल्यासारखंच आहे. पुंडलिक म्हणायचा की कविता लिहायची असेल तर आपलं आयुष्य, आपले अनुभव आठवून, त्यांच्याशी भांडून, त्यांना सामोरे जाऊन मग जे काही सांगावसं किंवा लिहावंसं वाटेल ती कविता...वा वा ... ही गोष्ट मला तेव्हाही कळली नव्हती आणि आजही कळली नाहीये...तरी आता मला कुस्ती तशी समजते पण कविता हे माझ्यासाठी अजूनही एक आश्चर्य आहे. कसलं लढायचं?.... कोणाशी लढायचं?......आपल्या आतलं देवपण वगैरे हे सगळं तेव्हाही माझ्या कुवतीपलीकडचं होतं आणि आजही आहे. पण आता माझ्यासमोर काही पर्याय नाहीये. मला हे काम केलंच पाहिजे. मी लिहायला सुरुवातही केलीये. चारच दिवसांपूर्वी मी ताराचंद जयस्वालला पाठवायच्या पत्राची सुरुवात आणि शेवट लिहिलाय....(वाचतो..) सुरुवात : नमस्कार ताराचंदजी, कसे आहात? मी बरा आहे. तुम्हीही बरेच असाल. माझी कविता खालीलप्रमाणे... शेवट: वरील कविता बरी आहे. मी ही बरा आहे. चूक-भूल द्यावी घ्यावी. ही कविता पाठवल्यानंतर मी हे घर, हे गाव, हा देश सोडून जातोय. माझा पाठलाग करायचा प्रयत्न करू नका. कवितासंग्रह नक्की छापा, माझी शपथ आहे तुम्हांला. आपला आज्ञाधारक, कवी राजकुमार गंभीर. गंभीर......गंभीर शब्द मी जोडून टाकला...तसा मला “समस्या” हा शब्द देखील आवडतो. पण कवी राजकुमार समस्या गंभीर हे नाव कदाचित तितकं चांगलं नाही वाटणार. म्हणून मग मी समस्या काढून टाकला. कवी राजकुमार गंभीर नाव बरं आहे. आता इतकं काम तर मी केलंय पण कवितेचं काय करू? ती तर लिहायचीच आहे. सगळे रस्ते बंद आहेत. लांबच लांब सरळ रस्ता आहे. कुठे लपायला एखादी गल्ली, दरी, कोपरा काही नाही. त्यामुळे मला पुढे जायचं आहे आणि लिहायचं आहे. एकच शपथ घेतली असती तर खरंच शपथ घेऊन सांगतो मी ती तोडली असती. पण उत्साहाच्या भरात इतक्या शपथा घेतल्या की आता त्या भूत बनून माझ्या मानगुटीवर बसल्या आहेत. अहो गांधीजी, माझं रक्षण करा. हे देवा, माझं रक्षण कर. नाही पण हे कोणी माझं रक्षण नाही करू शकणार. एक कवीच दुसऱ्या कवीचं रक्षण करू शकतो. आता पुंडलिकच मला वाचवू शकतो. तोच म्हणायचा स्वतःशी लढ...आणि मी लढतोय. पुंडलिकने जेव्हा मला आपल्या आईबद्दल सांगितलं होतं की कसं तिच्या शेवटच्या दिवसांत तो तिची सेवा करायचा...तशी मी ही कल्पना करू लागलो की माझ्या आईच्या शेवटच्या दिवसांत मी आईसाठी काय काय करेन. सगळ्यात आधी मी तिच्या हातातलं ते भांडं काढून घेऊन दूर कुठेतरी फेकून येईन. आणि एकदा तिला स्वतः लाल रिबीन बांधून सिनेमा बघायला घेऊन जाईन. कारण माझी खूप इच्छा होती हे बघायची की आई कशी बघत असेल सिनेमा? ती तिकिटाच्या रांगेत कशी दिसत असेल? इंटरवलमधे काय करत असेल? मुख्य म्हणजे त्या लाल रिबिनीचा सिनेमा बघण्याशी काय संबंध असेल? पण माझ्या या इच्छा पूर्ण नाही झाल्या. एके दिवशी सकाळी मी उठलो तर मला ती तिच्या पलंगावर दिसली नाही. ती दरवाजापाशी जमिनीवर उपडी पडलेली दिसली...तिच्या डोक्याला लाल रिबीन होती. मी हाक मारली...आई....आई...पण ती उठली नाही. मग मी “मदर” पण म्हणून पाहिलं. पण ती हलली सुद्धा नाही. मी घाबरलो. मी पुंडलिकला उठवायला गेलो पण जाण्यापूर्वी तिच्या केसांमधली लाल रिबीन काढून मी ती माझ्या खिशात ठेवली. तिची ही सिनेमावाली गोष्ट कोणाला कळावी अशी माझी इच्छा नव्हती. पुंडलिक आला. त्याने घोषणा करून टाकली की तयारीला लाग. तुझी आई मेली. अरे असं कसं झालं? कसली तयारी? आणि हे कसं शक्य आहे? मला दुख्ख नाही आश्चर्य वाटत होतं कारण मला माझी नाही तर घराची चिंता होती. हे घर काही म्हणणार नाही का? कारण आई आमच्याबरोबर नाही तर या घराबरोबर रहात होती. कदाचित या घराने आधी नष्ट व्हायला हवं होतं. बहुतेक म्हणूनच आई पलंगावर नाही तर खाली जमिनीवर, या घराच्या कुशीत गेली होती. तयारी कर म्हणून पुंडलिक निघून गेला. आईजवळ मला एकट्याला सोडून. मी काय करणार? मी तिला पाठीवर झोपवलं, तिच्या डोक्याखाली उशी ठेवली आणि त्या सुकलेल्या कडक देहाकडे पाहत राहिलो.......हिनेच मला जन्म दिला होता...किती विचित्र वाटतं ना... पुंडलिक अंत्यसंस्काराचं सगळं सामान आणि काही लोकांना घेऊन आला. मी रडत नव्हतो पण सगळे जण मला म्हणत होते की घाबरू नकोस. होतं असं...सगळं ठीक होईल वगैरे वगैरे....मग माझं मुंडण केलं गेलं आणि मी आईला अग्नी दिला. माझ्या आईला जळताना मी पहात होतो. अचानक त्या लाकडांमध्ये मला तिचा हात दिसला. मला वाटलं की ती तिच भांडं मागत्ये. माझ्या मनात आलं की तिचं ते भांडं तिच्या हातात द्यावं किंवा निदान तिची लाल रिबीन तरी तिच्या चितेत टाकावी पण माझी हिम्मत नाही झाली. तिला जळताना मी गुपचूप बघत राहिलो. या समोर धगधगणार्या लाकडांमध्ये माझी आई आहे...जी जळत्ये....घरी परत येताना वाटलं की कदाचित घर नसेलच आता...ते पडलं तरी असेल किंवा एखादी चीर तरी गेली असेल त्याला...पण असं काहीच झालं नव्हतं. सगळं काही नेहेमीसारखेच होतं. उन्हाची काहिलीने चेहरा करपला, सावली तळपायाखाली सरकली.. शरीर पाणी ओकायला लागलं... आणि तो वृक्ष जवळ आला.. त्याच्याच पदराखाली वाढलो मी. त्या मायेच्या ओलाव्याने तरारून हिरवा झालो मी ही. तुमचा विश्वास नाही बसणार, या जंगलातल्या एका झाडाने मला पाणी घातलं. “आई” म्हणतो मी त्याला. हल्ली राधे फारच उदास दिसायला लागला होता. तो बराच वेळ गांधी पार्कमध्ये गांधीजींबरोबर घालवायचा. म्हणायचा की हल्ली तो आणि गांधीजी खूप गप्पा मारतात. पण गांधीजींनी मला समजून घेतलंय, माफ केलंय आणि आता ते मला वैष्णोदेवीला जायचा फार आग्रह करत नाहीत. पण तो उदास होता कारण हल्ली गावात वैष्णोदेवीला जायचा सिझन सुरु झाला होता. लोक वैष्णोदेवीला जात होते...दर्शन घेऊन येत होते. पण राधेला सगळे हाकलायचे. राधेही अचानक एक दिवस यायचा बंद झाला. घरासमोर धूळच धूळ साठली होती. राधे येत नव्हता. मला वाटलं या धुळीत राधेचं किती सोनं विखरून पडलं असेल. मी केरसुणीने ती सगळी धूळ एकत्र केली. म्हटलं जेव्हा राधे येईल तेव्हा ही सगळी धूळ त्याला देईन. खुश होईल तो. पण तो आलाच नाही. मग एक दिवस अचानक आला. मी म्हटलं राधे कुठे होतास तू इतके दिवस? तो काही बोलला नाही. गप्प बसून राहिला. मी म्हटलं की अरे मी गांधी पार्कमधे गेलो होतो तू भेटशील म्हणून पण तू तिथेही नव्हतास. तरी हा गप्पच. बहुतेक त्याला उत्तर द्यायचं नव्हतं. मग मी ही गप्प बसून राहिलो. आणि मी इतके दिवस जी धूळ जमा करून ठेवली होती ती सुद्धा घ्यायला राधेने नकार दिला. म्हणाला की आता माझ्या कामाची नाहीये ही. असं म्हणताच त्याचं एक पांढरे गाठोडं झालं आणि माझ्यासमोर हलायला लागलं. इतके दिवस राधे येत नव्हता तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच मला कोणाच्या तरी नसण्याची जाणीव झाली. तसं पाहिलं तर पुंडलिक सुद्धा गेला होता. आई देखील गेली. पण तरी अशी जाणीव मला त्यांच्या नसण्यामुळे नव्हती झाली. जोपर्यंत राधे येत नव्हता ना तेव्हा मला वाटायचं की माझ्या आत खूप अशी जागा रिकामी झालीये आणि त्यात माझाच आवाज घुमतोय. बास, हे एव्हढंच आहे. यापलीकडे माझ्या आयुष्यात असं काहीही घडलेलं नाही ज्याचा मुद्दाम उल्लेख करावा. काही चिरी-मिरी गोष्टी आहेत जसं एक कुत्रा घराच्या मागच्या बाजूला रोज मला भेटायला यायला लागला होता. मी संध्याकाळी त्याच्याबरोबर वेळ घालवायला लागलो होतो. अगदी थोडेच दिवस झाले होते..त्याचं नाव ठेवावं या विचारांत असतानाच अचानक तो यायचा बंद झाला. आता फक्त राधे आहे, माझा तो ट्रकवाला मित्र आहे आणि मी आहे. आम्ही तिघे आहोत आणि खुश आहोत. लढाई संपली. हे एव्हढंच घडलंय माझ्या आयुष्यात...म्हणजे इतकंच जे मला आठवतंय आणि जे सांगण्यासारखं आहे. पण इतकं सगळं झाल्यावरही मला एक कळत नाहीये की यात असं काय आहे की जे कविता होऊ शकेल. पुंडलिक कवी आहे, कविता नाही. माझी आई ही माझीच आई आहे. ती गोर्कीच्या किंवा पुंडलिकच्या आईसारखी नाहीये. माझ्या आईबरोबरच्या घटना आहेत...कविता नाही. राधे हा राधे आहे. तो गांधी पार्क मधल्या गांधीजींची लाठी आहे. त्यापेक्षा तो आणखीन काही नाही. ट्रकवाल्या मित्राबद्दल मी गप्प राहणंच पसंत करतो. रघू हा माझ्यासाठी चमत्कार होता, आहे आणि राहील. तो माझा रघू आहे. पण कविता? ती कुठेच नाहीये. मी स्वतःशी जितकं लढू शकलो, लढलो. कुठे लपलीये ही कविता? मी इतक्या शपथा घेतल्यात. त्याचं काय? तिथे तो ताराचंद जयस्वाल वाट बघतोय. मी इथे एक शब्ददेखील लिहू शकत नाहीये. पुंडलिका मला माफ कर. नाही होणार हे माझ्याच्याने. शपथ वगैरे सगळं गेलं चुलीत..... “आटली बाटली कचकन फुटली”....मी घेतलेली शपथ फटकन सुटली... छे, छे याने काहीही होणार नाहीये. हे सगळं मी माझ्या मनाच्या समाधानासाठी करतोय. मी एक प्रकारचा खेळ खेळतोय..स्वतःशीच. कधीपर्यंत चालणार आहे हा खेळ? मला लिहायचं आहे आणि मी ते लिहिणारच. चला, तय्यार.........ताराचंद जयस्वालसाहेब, हे घ्या तुमचं पत्र...पूर्ण केलेलं पूर्ण पत्र. आता तुम्हांला जे काही समजायचं असेल ते समजा. (वाचतो...) सुरुवात : नमस्कार ताराचंदजी, कसे आहात? तुम्ही बरेच असाल. माझी कविता खालीलप्रमाणे... जादू पहा जादू...साखरेच्या पाच दाण्यांची जादू.... मुंग्या धावतात, धाव धाव धावतात.. दोन दाण्यांजवळ पोचतात, मग आणखी तीन दाणे दिसतात.... “या गं या सगळ्या जणी या...” सगळ्या जणी येतात, पाचव्या दाण्याजवळ पोचतात, मग मागचे दोन विसरून जातात! मग तेच दोन दाणे पुन्हा पुढे दिसतात... मुंग्या धावतात, धाव धाव धावतात... मुंग्या हरवतात ....जादूत हरवून जातात.. अशा फिरतात, तशा फिरतात, फिरतच रहातात. हा खेळ संपतच नाही. पण त्या तर फक्त शोधतायत.... त्या खेळ कुठे खेळतायत... खेळणारा तो कोणी वेगळाच आहे......एक जादुगार! शेवट: वरील कविता बरी आहे. मी ही बरा आहे. चूक-भूल द्यावी घ्यावी. ही कविता पाठवल्यानंतर मी हे घर, हे गाव, हा देश सोडून जातोय. माझा पाठलाग करायचा प्रयत्न करू नका. कवितासंग्रह नक्की छापा, माझी शपथ आहे तुम्हांला. आपला आज्ञाधारक, कवी राजकुमार गंभीर. ....बराय ना? (मुंग्यांशी खेळायला लागतो..)